शिवसेनेत फूट पडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातून सर्वप्रथम नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन कृषी मंत्री असलेले दादा भुसे यांनी त्यानंतर शिंदेंना पाठिंबा देत शिंदे गटात सामील झाले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला हा जबर धक्का होता. मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ घोषित झाल्यानंतर भुसे यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाली. आता शिंदे गटातील नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांनीच पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याने आमच्यात सर्व काही आलबेल आहे व आम्ही नाशिक जिल्ह्यात एकमुखाने काम करीत असल्याचे स्पष्टीकरण देणाऱ्या ना.भुसेंच्या वक्तव्यावर त्यांच्याच पक्षातील आमदाराने केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. महत्वाच्या बैठकांना का बोलावले जात नाही, असा सवालच सुहास कांदे यांनी दादा भुसेंना विचारल्याने नाशिकमध्ये शिंदे गटात आलबेल नसल्याचे समोर येत आहे.
दरम्यान गेल्या दीड दोन महिन्यांपासून आमदार सुहास कांदे हे कोणत्याही कार्यक्रम, अथवा बैठकांना दिसत नसल्याची बाब माध्यम प्रतिनिधीनीं दादा भुसेंच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी दादा भुसेंनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि, याबाबत कोणताही चुकीचा अर्थ न लावण्याची विनंती करतानाच आम्ही एक दिलाने काम करीत असल्याची ग्वाही दिली. पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत भुसे यांनी कांदे यांच्या प्रश्नावर अधिक स्पष्टपणे भूमिका मांडत कोणताही गैरसमज करू नये असे सांगितले. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येऊन गेले. त्यावेळी कांदे या ठिकाणी उपस्थित नव्हते. याशिवाय शिंदे गटाच्या कार्यक्रमांना देखील कांदे फारसे दिसत नसल्याचे भुसेंना सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून या चर्चा सुरु असताना सुहास कांदे यांनी यावर पडदा टाकला असून विशेषतः याबाबत भुसेंनाच जाब विचारण्याचा सल्ला दिला आहे. कांदे म्हणाले कि, महत्त्वाच्या बैठकांना का बोलावले जात नाही, हे भुसेंना विचारावे. मात्र शिंदे गटासोबत आपण मरेपर्यंत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आपण नाराज नसून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचे सुहास कांदे यांनी स्पष्ट केले