loader image

नव्याने होणार महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना – नगरविकास विभागाचे आदेश

Nov 23, 2022


मुंबईसह राज्यातील २४ महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने काल जारी केले आहेत. नवी मुंबई, मुंबई आदी महापालिकांची मुदत संपली आहे. तर काही महापालिकांची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे, अशा सर्व महापालिकांनी निवडणुकीसाठी प्रभाग संख्या / रचना निश्चित करावेत, असे आदेश नगरविकास खात्याचे आहेत. त्यामुळे लवकरच सर्व महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येतील, असे संकेत यातून मिळत आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्या वाढीच्या आधारावर सरासरी प्रभाग/ वॉर्ड संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईसह राज्यातील बहुतेक सर्व महापालिकांत ९ नगरसेवकांची वाढ झाली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारचा निर्णय नव्या सरकारने बदलला होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. येत्या २८ नोव्हेंबर रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.
मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांच्या निवडणुका कधी होणार याचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. तर दुसरीकडे, राजकीय नेतेही राज्यातील भाजप व शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल व मध्यावधी निवडणुका लागतील, अशी भाकिते करीत आहेत. अशातच मंगळवारी नगरविकास खात्याच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी – छापवाले यांनी सर्व महापालिका आयुक्तांसाठी तातडीने एक पत्रक जारी केले असून त्यामध्ये महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जनगणनेनुसार प्रभागांची संख्या/ रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे आदेश दिले आहेत.

मुंबई महापालिका अधिनियम 1888 व महानगरपालिका अधिनियम 1949मध्ये संदर्भीय केलेल्या तरतूदीप्रमाणे मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महापालिकांची आगामी निवडणूक घेण्यासाठी प्रभागांची संख्या/ रचना निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, सचिव, राज्य निवडणूक आयोग, नगरविकास खात्याचे संबंधित सहसचिव आणि उपसचिव यांनाही या पत्रकाची प्रत पाठवून तुमच्या अखत्यारीत महापालिकांची निवडणुकीसाठी आवश्यक प्रभाग संख्या व रचना निश्चित करण्यासाठी आपण जातीने पाठपुरावा करावा, असे म्हटले आहे.

या 24 महापालिकांच्या प्रभागांची पुनर्रचना
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, संभाजीनगर नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा – भाईंदर या 23 महापालिकांची मुदत संपली आहे. तेथे सध्या प्रशासक कारभार पाहत आहेत. तर नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी महापालिकेची प्रथमच निवडणूक होईल. त्यामुळे सध्या राज्यातील २८ पैकी २४ महापालिकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात येईल.


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.