कोटमगाव तालुका येवला येथे विवाह निमित्त आलेल्या नाशिक येथील महिलेच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याची पोत ओरबाडून चोरटे पसार झाल्याची घटना घडली असून नागरिकात खळबळ माजली आहे.नाशिक येथील
सविता सतीश मोकळ ह्या लग्नकार्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडे कोटमगाव येथे आल्या होत्या. विवाह सोहळा आटोपून त्या घरी जाण्यासाठी निघाल्या असता अंदरसूल दिशेने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची पोत बळजबरीने ओरबाडत येवला दिशेने पोबारा केला. सौ. मोकळ यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याचे विरोधात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
शहर पोलीस हद्दीमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. सध्या शहरात पोलीसांकडून हेल्मेट सक्तीसाठी मोहीम सुरू असून त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. असे असतानाही सोनसाखळ्या ओरबाडून नेल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.










