चांदवड : भारत माता की जय, वंदे मातरम, हिंदुस्थान झिंदाबाद, अमर रहे अमर रहे, वीर जवान सूरज अमर रहे’ च्या जयघोषात चांदवडचे भूमिपुत्र सूरज उल्हास चौबे (३३) यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
चांदवड शहराचे भूमिपुत्र सूरज हे भारतीय सैन्य दलात हरियाणा राज्यातील अंबाला येथे लान्स नायक पदावर कार्यरत होते. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी (ता.११) त्यांना वीरमरण आले. गुरुवारी (ता. १२) सकाळी जवान सूरजचे यांचे पार्थिव गावात आले. त्यानंतर रथातून शहरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात
आली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर, भूषण कासलीवाल, नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी, पोलिस निरीक्षक समीर बारवकर, सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील, नाशिक आर्टिलरी सेंटरचे नायब सुभेदार डी. विमल व त्यांच्या ११ सहकाऱ्यांनी सूरज यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बाळासाहेब वाघ, मनोज शिंदे, सुनील शेलार, कारभारी आहेर, पिंटू संचेती, अशोक गायकवाड, अशोक व्यवहारे, मोहन शर्मा, विजय सांबर, राम बर्वे, गणेश वाघ, संतोष सुतारे, गुड्डू खैरनार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.