ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २०२१ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमास भारतरत्न सचिन तेंडुलकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या आठ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांनी गायन आणि संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा बजावली आहे. या कुटुंबातील एक घटक असलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे. आशाताई भोसले या महाराष्ट्राची शान आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.
आशाताई भोसले यांनी आतापर्यंत विविध भाषांतून हजारो गीते गायिली. त्यांनी भक्ती संगीतापासून ते डिस्कोपर्यंतच्या विविध गीतांचा खजिना उपलब्ध करून दिला. त्यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा गौरव वाढला आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी आपल्या वाटचालीत संघर्ष अनुभवताना दुसऱ्यांचा संघर्ष गीतातून आनंदी केला आहे. त्यांनी गायिलेली गीते आजही ताजीतवानी वाटतात. पुढेही ती तशीच राहतील. ही गाणी सर्वांना प्रेरणादायी ठरतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.