अंजनगावसुर्जी तालुक्यातील कारला येथे एक आगळा-वेगळा आणि रुढी-परंपरेला फाटा देणारा विवाह संपन्न झाला. महामानवांच्या विचारांनी प्रेरीत झालेले दाळू अणि पोळकट या दोन कुटुंबांनी या योग जुळून आणला. दाळू यांच्या कुटुंबातील मुलगी आणि पोळकट यांच्या कुटुंबातील मुलगा यांचा ऋणानुबंध जोडणारा शिवमंगल सोहळा म्हणून त्याकडे पाहिले जाते.
वाजंत्री, फटाके, अहेर, हार-तुरे यावर होणारा अनाठायी खर्च टाळत शिवमंगल परिवर्तनशील शिवविवाह सोहळ्याची विशेषतः म्हणजे मुलीचे वडील शिवदास दाळू यांनी हुंडा पध्दत नाकारत साध्या पद्धतीने विवाह केला. लग्नसमारंभात होणाऱ्या खर्चात बचत करुन जावई वैभव आणि मुलगी क्रांती हिला हुंड्यात सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या ग्रंथालयाला ग्रंथ व स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्याचा संकल्प केला होता. त्याची संकल्पपुर्ती यावेळी करण्यात आली. त्यासाठी लग्नविधीदरम्यान नवरीची ग्रंथतुला करण्यात आली. या शिवविवाह सोहळ्याला प्रसिद्ध समाज सुधारक सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज, आमदार देवेंद्र भुयार, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर, विजयभाऊ सारभुकन, संदीपपाल महाराज, रामपाल महाराज आदी मान्यवरांसह दोन्ही कुटुंबीयांचे नातेवाईक उपस्थित होते.
दरम्यान विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या वऱ्हाडी मंडळींसह उपस्थित शाळकरी मुला-मुलींना भेट म्हणुन राष्ट्रसंतांची ग्रामगीता, महामानवांची पुस्तके देण्यात आली. या आगळ्या-वेगळ्या व परंपरेला फाटा देणाऱ्या लग्नसोहळ्याची तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे.