जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही कमी होत नसून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात मोठा मासा गळाला लागला आहे. गेल्या काही वर्षातील एसीबीची ही मोठी कारवाई आहे. नाशिक येथील तालुका सहायक निबंधकच तब्बल २० लाखाची लाच घेताना एसीबीच्या पथकाला रंगेहाथ सापडला आहे. विशेष म्हणजे, या लाचखोरीत तालुका निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाचाही सहभाग होता. त्यामुळे सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहितीनुसार, लाचखोर सहाय्यक निबंधकाचे नाव रणजित पाटील असे आहे. सावकारी कायद्यातर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाटील याने २० लाख रुपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकारात वरिष्ठ लिपीक प्रवीण अर्जुन वीरनारायण याचाही सहभाग होता. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
या मोहिमेत सापळा अधिकारी संदीप साळुंखे , पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक. तसेच सापळा पथक पो.ना. प्रवीण महाजन, पो. ना. नितीन कराड, पो. ना. प्रभाकर गवळी सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नाशिक तर मा.सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांचे मार्गदर्शनाखाली सापळा यशस्वी करण्यात आला.
एसीबीच्या पथकाने सापळा रचत या सापळ्यात लाचखोर निबंधक पाटील आणि लिपीक वीरनारायण ह्यांना रंगेहाथ पकडले. त्यांनी २० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून यासंदर्भात तक्रार करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक वालावलकर यांनी केले आहे.