मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. नागपूर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होते. दुसऱ्या टप्प्यातील नाशिकमधील भरवीरपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. येत्या 26 मे रोजी शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यावर शिर्डी ते भरवीर अंतर 40 ते 45 मिनिटांत पार करता येणार आहे.
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू झाला आहे. तर, उर्वरित टप्प्याचे काम सुरू आहे. त्यापैकी शिर्डी ते भरवीर पर्यंतचे 80 किमी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे.
शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते भरवीर असा 600 किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील डिसेंबर 2022 ला नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानुसार शिर्डी ते भरवीर अशा 80 किमीच्या महामार्गाचे काम जवळपास झाले आहे.