मालेगाव शहरातील मोहनपीर गल्लीतील वर्दळीच्या सराफ पेठेत असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानातून भरदिवसा तीन बुरखाधारी महिलांनी हातचलाखी करुन सव्वासात लाख रुपयांचे दागिणे चोरुन नेले. सराफ पेठेत भुरट्या महिलांकडून दागिने पाहण्याच्या निमित्ताने किरकोळ वस्तु चोरीचे प्रकार घडत असत. मात्र सव्वासात लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या फुल्या व मुरनीचा बॉक्सच लंपास झाल्याने सराफ पेठेत एकच खळबळ उडाली आहे.
मोहनपीर गल्लीतील दर्ग्यासमोर मेसर्स वर्मा गोल्ड ज्वेलर्स हे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी सहाला तीन अनोळखी बुरखाधारी महिला दुकानात आल्या. त्यावेळी ज्वेलर्सचे मालक नटवरलाल शिवरतन वर्मा (वय ५५, रा. बुरुड गल्ली, बालाजी मंदिराच्या पाठीमागे) हे ग्राहक करीत होते. यावेळी या भामट्या महिलांनी दागिने पाहण्याच्या निमित्ताने हातचलाखी करून एक लाख २९ हजार ६०० रुपये किमतीच्या ३०० मिली वजनाच्या ९० सोन्याच्या फुल्या, १ लाख ३४ हजार ४०० रुपये किमतीच्या ३५० मिली वजनाच्या ८० सोन्याच्या फुल्या, दोन लाख २५ हजार ६०० रुपये किमतीच्या ५०० मिली वजनाच्या ९४ सोन्याच्या फुल्या असे एकूण ७ लाख २९ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. काही वेळातच दुकान मालकाच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी किल्ला पोलिस ठाण्यात धाव घेतली. उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक गौतम तायडे, उपनिरीक्षक अभय ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पोलिसांनी दुकानातील व परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. दुकानाच्या सीसीटीव्हीत या बुरखाधारी महिला कैद झाल्या आहेत. नटवरलाल वर्मा यांच्या तक्रारीवरून महिलांविरुद्ध किल्ला पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








