मनमाड : योगेश म्हस्के – कर्तव्य आणि कर्म करीत राहणे ही खरी परमेश्वरभक्ती होय. अशी प्रवृत्ती मार्गी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. अवघिया पुरते वोसंडले पात्र।अधिकार सर्वत्र वाहे येथे।अशा उदार आणि सर्वसमावेशक तत्त्वावर संत ज्ञानदेव, संत नामदेवांच्या भागवत धर्माची वारकरी संप्रदायाची उभारणी झाली.
संत सावता माळी हे ज्ञानदेवांच्या काळातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ. स. १२५० चा आहे आणि त्यांनी इ. स. १२९५ मधे देह ठेवला. अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय , कर्म करीत रहाणे हीच खरी ईश्वर सेवा आहे अशी शिकवण सावता माळी यांनी दिली. वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ संत म्हणुन त्यांचा लौकिक आहे. ते विठ्ठलाचे परम भक्त होते. ते कधीही पंढरपुरला गेले नाहीत. असे म्हटले जाते की खुद्द्द विठ्ठलच त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात असे.त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर जप, तप यांची आवश्यकता नाही तसेच कुठे दूर तिर्थयात्रेला जाण्याचीही गरज नाही; केवळ ईश्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन केल्यास आणि श्रद्धा असल्यास ईश्वर प्रसन्न होतो आणि दर्शन देतो असा विचार त्यांनी मांडला.
संत सावता माळी यांनी ईश्वराचा नामजप करण्यावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहूनही त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते. असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच पांडुरंग पाहिला. त्यांना 45 वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून विचारले त्यांचे 37 अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 दिनांक 12 जुलै 1295 यांनी आपला देह ठेवला. पंढरपूर जवळील अरण येथे संत श्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे.आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो. सावता महाराज आपले शेत सोडून कधी पंढरपूरला आले नव्हते असे मानले जाते. पांडुरंगच त्यांना भेटण्यासाठी अरण येथे गेले. आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही. आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे जाते.
मनमाड शहरामध्ये श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी महात्मा फुले माळी समाज मित्र मंडळाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली , श्री दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या श्री संत सावता माळी महाराज मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली असुन पहाटे श्री विठ्ठल-रखुमाई आणि संत सावता माळी यांच्या मुर्तीला महाअभिषेक पुजन , सत्यनारायण पुजा ,महाआरती , शहरामध्ये सकाळी आकर्षक अश्वरथामध्ये श्री संत सावता माळी यांच्या प्रतिमेची बाल टाळकरी-वारकरी आणि समाज बांधवांसह , टाळ-मृदुंगाच्या गजरामध्ये नगर प्रदक्षिणा काढण्यात आली , किर्तनाचा कार्यक्रम होऊन समाज बांधव आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमांना शहरातील माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.