नांदगाव तालुक्यात यंदा पुरेसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नांदगाव तालुक्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील शेतकरी, नागरिक व हातमजूर कामगार व इतर घटक हवालदिल झाले आहे. दुष्काळाचे गंभीर परिणाम दिसत असून शेतकऱ्यांनी पेरलेले पिक येऊ शकलेले नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकाचे नुकसानीची भरपाई मिळावी तालुक्यातील ज्या गावांमध्ये पिण्याचे पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे त्या गावांना तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करणेत यावा. दुष्काळाची तीव्रता पाहता जनावरांचे देखील चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे जनावरांसाठी तालुक्यात ठिकठिकाणी चारा छावण्या सुरू करणेत याव्यात.
केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क आकारणेचा निर्णय घेतलेला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या शासन निर्णयामुळे कांद्याचा बाजारभाव पडण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सदरचे निर्यात शुल्कवाढीचा निर्णय केंद्र शासनाने त्वरीत मागे घ्यावा. राज्य सरकारने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान जाहीर केलेले आहे मात्र ते अद्यापही शेतकऱ्यांचे खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे सदरचे कांदा अनुदान तात्काळ सरसकटपणे एकरकमी कोणतेही टप्पे न करता शेतकऱ्यांचे खात्यात जमा
करणेत यावे तसेच कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांचे ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाचे नोंद असोची अट शिथील करण्यात यावी व तात्काळ सरसकट सर्व शेतकर्यांचे बँक खात्यात सदरचे कांदा अनुदान जमा करणेत यावे. तालुक्यातील शेतकऱ्यांना सन २०१८ ते २०२० मधील पिक विम्याचे पैसे अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे सदर पिक विम्याचे पैसे देखील संबंधीत शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवेदन देऊन करण्यात आली आहे. सर्व मागण्यासंदर्भात तात्काळ निर्णय न घेतल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश जगन्नाथ पात्रक यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तालुक्यातील समस्त शेतकरी हातमजूर कामगार व इतर घटक यांना सोबत घेऊन राष्ट्रीय महमार्ग बंद करण्यात येईल व रेल रोको सारखे अतिउग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्यांच्या होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी असा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, उप जिल्हा प्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख माधव शेलार, भाऊ पाटील,दिनेश केकाण, कैलास भाबड,अनिल दराडे, विनय आहेर, संजय कटारिया, सनी फसाटे, इरफान शेख, भैया घुगे आदींसह शिवसेना पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.