loader image

मनमाड शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Apr 11, 2024


मनमाड : (योगेश म्हस्के) शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मनमाड शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली , सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या जोतिबा फुले यांना जनतेने महात्मा पदवी बहाल केली.

साताऱ्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा जोतिबांनी निश्चय केला. इ.स. १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या भिडे वाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा जोतिबांनी स्थापन केली. या शाळेतील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपविली. यानंतर जोतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली . जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जनतेने त्यांना मुंबईतील एका सभेत इ.स. १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे जोतिबा फुले हे ‘महात्मा फुले’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

मनमाड शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली , शहरातील महात्मा फुले चौक येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा फुले माळी समाज मित्र मंडळ , शहरातील अनेक सामाजिक, राजकीय संघटना आणि महात्मा फुले प्रेमी नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

.