मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित मनमाड येथील महर्षी वाल्मिकी क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला मनमाड शहर आणि पंचक्रोशीतील भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असुन , या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकरांच्या किर्तनांची पर्वणी ही भाविकांनी प्राप्त होत आहे.
शनिवार दिनांक 4 मे पासुन सुरवात झालेल्या या सोहळ्याचा शुभारंभ हा श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाड पर्यंत पायी आणलेल्या नाथज्योतीच्या भव्य स्वागत यात्रेने करण्यात आला.या सोहळ्यासाठी महर्षी वाल्मिकी क्रीडांगण येथे भव्य मंडप साकारण्यात आलेला असुन रोज पहाटे काकडा , सकाळी 10 ते 12 कीर्तन, दुपारी 4 ते 5 प्रवचन, 5 ते 6 हरिपाठ , 6 ते 8 हरी कीर्तन आणि दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेला भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या सोहळ्यामध्ये आतापर्यंत हभप संजय महाराज धोंडगे , हभप समाधान महाराज पगार, हभप बंडातात्या महाराज कराडकर, हभप कान्होबाराय महाराज मोरे, हभप बाळकृष्ण महाराज बुरकुल, हभप लक्ष्मण शास्त्री महाराज कोकाटे , हभप निवृत्ती महाराज रायते यांची कीर्तन सेवा झाली असुन पुढील राहिलेले दिवस हभप पोपट महाराज पाटील, हभप अनिल महाराज पाटील, हभप जगन्नाथ महाराज पाटील, हभप विश्वनाथ महाराज वारींगे, हभप योगीराज महाराज गोसावी, हभप तुकाराम महाराज जेऊरकर, हभप ज्ञानेश्वर महाराज कदम, हभप उमेश महाराज दशराथे, हभप महादेव महाराज राऊळ, हभप एकनाथ महाराज सदगीर या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध असणाऱ्या कीर्तनकार मंडळींच्या किर्तनांची आणि प्रवचनाची पर्वणी रोज सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 6 ते 8 वाजता भाविकांना प्राप्त होणार आहे.
मनमाड शहरात होणाऱ्या या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशा अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्यासाठी भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग प्राप्त होत असून, अन्नदान सेवेसाठी देखील मनमाड पंचक्रोशीतील गावांचा मोठा सहभाग मिळत आहे, दररोज वेगवेगळ्या गावांनी अन्नदान सेवा घेतली असुन रोज पोळी-भाकरी,आमटी हे गावकरी सोहळ्यातील भाविकांना पुरवत आहे. भाविकांनी दररोज अशाच मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहून भक्तिमय किर्तनांच्या पर्वणीचा आनंद लुटण्याचे आव्हान श्री संत एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे