मालेगाव,नांदगाव,मनमाड, दि.९ मे :- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार करत असल्याचे आरोप आमदार सुहास कांदे यांनी प्रचार सभेत केले आहे. आमदार सुहास कांदे यांनी केलेले आरोप हे साफ चुकीचे असल्याचे उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील व रतन हलवर यांनी केले आहे.
महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांच्या प्रचारार्थ नांदगाव येथे झालेल्या प्रचार सभेत आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार करत असल्याचे आरोप केले. या आरोपाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील व रतन हलवर यांनी खंडन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. त्यामुळे आमदार सुहास कांदे यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे कि, महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नांदगाव मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात सहभागी होऊन त्यांच्या विजयासाठी काम करत आहे. मात्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांना नाहक बदनाम करण्यासाठी आमदार सुहास कांदे यांचे हे षड्यंत्र आहे. नांदगाव मतदारसंघातील लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते चुकीचा प्रचार करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ.भारती पवार यांच्या प्रचारार्थ सुरु असलेल्या सभा आणि प्रचार दौऱ्यात बहुसंख्येने सहभागी होत असून महायुतीचा धर्माचे पालन करत आहे.