मनमाड – शैक्षणिक वर्ष 2024.25 करीता बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा आधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(सी)(1) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहायित शाळा, विनाअनुदानित शाळा इ. मध्ये आरटीई 25% सुधारीत प्रवेश प्रक्रिया मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवार, दिनांक 17/05/2024 ते 31/05/2024 या कालावधीपर्यंत बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याबाबतची सुधारीत सुचना परिपत्रक महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी प्रसिध्द केली आहे.
तरी शैक्षणिक वर्ष 2024.25 मध्ये आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकांच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जाचा सन 2024-25 या वर्षाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. याची पालकांनी नोंद घ्यावी. तसेच उपरोक्त नमूद शासन परीपत्रकात दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचना, नियम व नियमावली पालकांनी काळजीपूर्वक वाचून व समजून घेवून विहित मुदतीत पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जावून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
25% प्रवेशप्रक्रियेकरीता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी. शाळेपासून ते घरापर्यंतचे अंतर गुगलमॅपने निश्चित करून अचूक लोकेशन नोंदवावे. अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणी लक्षात घेता शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावेत. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पून्हा अर्ज करता येणार नाही. एकापेक्षा अधिक अर्ज भरता येणार नाही. अर्ज भरल्यानंतर पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वर वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे अवलोकन करावे.
प्रवेशप्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन व लॉटरी पध्दतीने आहे. प्रवेश मिळणे अथवा अपात्र ठरणे यासाठी मुख्याध्यापक, शालेय प्रशासन, संस्था व संबंधित शिक्षणविभाग जबाबदार राहणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी. शासन परिपत्रकात नमूद वंचित व दुर्बल घटकातील विद्याथ्र्यांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची खात्री करूनच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन प्राचार्य श्री. मुकेश मिसर व मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे यांनी शाळेतर्फे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केले आहे.