मनमाड – येथील कवी रबिंद्रनाथ टागोर अँड ज्यु. काॅलेज येथे अष्ठपैलू प्रेरणादायी वक्ते श्री. चंद्रकांत पागे यांचा परीक्षेची भीती ताण-तणाव दूर करून प्रचंड मनोबल वाढवणारा प्रेरणादायी आॅडिओ-व्हिज्युअल कार्यक्रम ‘येवू दे परीक्षा, आम्ही तयार आहोत’ मोठया उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मार्गदर्शक श्री. चंद्रकांत पागे आणि उपस्थितांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. पाहुण्यांचा परीचय प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांनी करून दिला तसेच प्रमुख पाहुणे श्री. पागे यांचा शाळेच्यावतीने सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देवून तर श्री. जितेंद्र चौधरी यांचा सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
श्री. चंद्रकांत पागे यांनी आपल्या संयत परंतू उत्साही शब्दांमध्ये ऑडिओ-व्हिज्युअल साधनांची मदत घेत ‘येवू दे परीक्षा-आम्ही तयार आहोत’ हा विषय अतिशय परिणामकारकरित्या मांडून उपस्थितांची दाद मिळवली. अभ्यास कसा करावा इथपासून परीक्षा हाॅलमधून कसे बाहेर यावे याचे विवेचन त्यांनी आपल्या चर्चासत्रात केले. स्लोअली अॅण्ड स्टेडीली विन्स अ रेस हे कालबाहय झाले असून फास्ट अॅण्ड स्टेडी विन्स द रेसचा जमाना आलेला आहे. अभ्यासाचा ताणतणाव हा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे, त्याच्याकडे सकारात्मक बघा व तणावाचंही स्वागत करा. तणाव आणि ध्येय असल्याशिवाय चांगला परफाॅर्मंन्स देता येत नाही. तणावाचं व्यवस्थापन करून संभाव्य अडथळयांचा अंदाज घेवून पाठांतरापेक्षा आपल्या मित्र-मैत्रिणींशी विषय व घटकनिहाय चर्चा केल्याने यश मिळतेच, त्याशिवाय टिमवर्क या संकल्पनेचा प्रत्यय आपणांस येतो. आपल्या व्याख्यानात पेन धरण्याची अचूक पध्दती, मान व पाठ अवघडणे, डोळे चुरचुरणे या साध्या गोष्टीसाठी त्यांनी सुलभ व प्रात्यक्षिक व्यायामदेखील विद्याथ्र्यांना दाखवले. माईंड रूल्स द बाॅडी या सुत्राच्या प्रात्यक्षिकाने उपस्थितांच्या डोळयातून अश्रूंना वाट करून दिली. याशिवाय परीक्षाकाळात कुठला आहार घ्यावा व जंकफूड का टाळावे याचे त्यांनी वैज्ञानिक विश्लेषण केले व स्किपींग, जीना चढणे, उतरणे, शतपावली करणे अशा लहानसहान व्यायामांवर देखील भर दिला. परीक्षेच्या आदल्या दिवशी नव्याने अभ्यास करणे थांबविणे आवश्यक आहे, केवळ केलेल्या अभ्यासाची उजळणी करावी. परीक्षाकालावधीत नेहमी स्वतःला सकारात्मक आज्ञा दयाव्यात. आपल्या शाॅर्ट टर्म आणि लाॅंग टर्म मेमरीचा इफेक्ट काय असतो इ. बाबी त्यांनी समजून सांगितल्या. जेसिका काॅक्स जन्मतः हात नसणारी व नीक विजुसिक जन्मतः हातपाय नसलेली व्यक्ती यांचे प्रेरणादायी व्हिडीओ दाखवून ते आज जागतिक स्तरावर प्रेरणादायी वक्ते बनू शकतात व प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आपल्या जगण्यातून व कार्य-कर्तृत्वातून जगाला दाखवू शकतात तर आपण अनूकुल परिस्थितीत राहून व सुविधांची रेलचेल असतांना यश का मिळवू शकत नाही? कारण यश कधीही योगायोगाने मिळत नाही, तर ते खेचून आणावं लागतं याची जाणिव विद्यार्थ्यांनी ठेवावी. यशाच्या आसमंतात उत्तुंग भरारी घेण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे आणि कोणतीही समस्या कायमस्वरूपी नसते व कोणतीही परीक्षा आयुष्यातली शेवटची परीक्षा नसते ही खूणगाठ प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या मनाशी बांधून ठेवावी असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
साडेतीन तास चाललेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमात गुंजन सांगळे, अनुष्का पगारे, अपूर्वा व्दिवेदी, सई झाल्टे, तनुश्री नाईक आणि खुशी वाजे या विद्यार्थिंनींनी आपले मनोगत व्यक्त करून श्री. पागे यांचे प्रेरणादायी व्याख्यानाबद्दल आभार व्यक्त केेले.
तसेच उपस्थितांमधून श्री. सुनिल गवांदे, सौ. कुंदा कुलकर्णी मॅडम, श्री. राहूल शेजवळ आणि श्री. हर्षवर्धन काळे यांनी या उपक्रमाबद्दल वक्ते व शाळेचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. रूपाली निंभोरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, श्री. धनंजय निंभोरकर यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिका-यांचे मार्गदर्शन लाभले तर शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.