नांदगाव ( प्रतिनिधी )आज समाजात अनेक धर्मातील धार्मिकतेच्या नावाखाली साजऱ्या होणाऱ्या सण-समारंभ, उत्सवाला जाणीवपूर्वक ऊन्मादी अवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न होताना दिसतो.
त्यामुळे समाजात निखळ आनंद, मनोरंजन, सार्थकता, कृतज्ञता, समाधान अशा भावना निर्माण होण्याऐवजी भीती, अफवा, अंधश्रद्धा, अस्वस्थता, पर्यावरणाचा नाश अशा विनाशकारी गोष्टी घडताना दिसतात.हे अरिष्ट थांबवण्याची ताकद विवेकात असते आणि विवेकी समाजमन घडवण्याची क्षमता शिक्षकांमध्ये अधिक असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले.
नांदगाव येथील शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये डॉ. गोराणे बोलत होते.ते पुढे म्हणाले की, जेव्हा समाजात कालबाह्य, निरर्थक कर्मकांडांना महत्व दिले जाते, त्यामुळे समाजात दैववादीपणा व अंधश्रद्धा वाढीस लागतात आणि प्रयत्नवाद खिळखिळा होतो.
दैववादीपणा, अंधश्रद्धा यांनाआळा घालण्यासाठी शिक्षण प्रक्रियेतून वैज्ञानिक दृष्टिकोन जाणीवपूर्वक विकसित करणे आवश्यक असते. वैज्ञानिक दृष्टिकोनाला मूल्यांची जोड दिली की माणसाच्या मनात विवेकाची निर्मिती होते. मग व्यक्ती व समाजाच्या हातून विवेकी वर्तन घडते.
मात्र त्यासाठी शिक्षकांनी स्वतःचे निरीक्षण, तर्क, अनुमान ,प्रचिती, प्रयोग या शास्त्रीय विचारपद्धती बरोबरच स्वतः चे वाचन, लेखन, चिंतन, मनन वाढवले पाहिजे.
या प्रशिक्षण कार्यशाळेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आशय स्पष्ट करण्यासाठी रिकाम्या तांब्यातून पुन्हा पुन्हा पाणी काढणे ,अंधश्रद्धेची बेडी सोडवणे ,स्पर्श भ्रम, दृष्टी भ्रम कसे होतात ते प्रयोगातून दाखविले.
अशा विविध चमत्कार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून,
त्यामागील शास्त्रीय कार्यकारणमीमांसा त्यांनी स्पष्ट केली .चमत्कार कधीच घडत नसतात. त्यामागे हातचलाखी ,सराव, विज्ञानाच्या नियमांचा वापर ,रासायनिक पदार्थांचा बेमालूम वापर अशा प्रमुख गोष्टींचा वापर केलेला असतो.प्रशिक्षणार्थींकडून चमत्कार प्रात्यक्षिकांचा सराव करून घेण्यात आला.
त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत नांदगाव अंनिस शाखेचे अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, पिंपरखेड शाखेचे अध्यक्ष संजय कांदळकर होते.