मनमाड – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुढाकाराने आज तमाम स्त्रिया शिक्षित झाल्यात. परंतु त्यांतील एकही स्त्री सावित्री झाली नाही, का? हा प्रश्न आणि त्यास उत्तर देणाऱ्या सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित ‘लोक-शास्त्र सावित्री’ या नाटकाच्या प्रभावी प्रयोगाने भीमोत्सव २०२५ चे पहिले पुष्प गुंफले गेले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त, एकात्मता चौक येथे सादर झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
“थिएटर ऑफ रेलेव्हन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता” प्रस्तुत व मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित या नाटकात सावित्रीबाईंच्या विचारांची सांगड वर्तमानाशी घालण्यात आली आहे. ‘सावित्री’ ही प्रत्येकाच्या मनात असते, पण सामाजिक व्यवहारांमुळे ती हरवते, या संकल्पनेवर आधारित नाटकाने उपस्थितांना अंतर्मुख केले.
या नाटकातील “सावित्री महिलांसाठी सावित्री झाली, कारण तिने स्त्री शिक्षणाचा लढा दिला” यांसारखे संवाद गतकाळात नेऊन तिच्या संघर्षाची जाणीव करून देतात. परंतु सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाच्या संघर्षाच्या पुढे आपल्याला हे नाटक घेऊन जाते. वाचण्याच्या पलीकडे सावित्रीला वर्तमानात शोधणे, तिला आपल्या आत रुजवणे हा संदेश हे नाटक आपल्याला देते.
आज आपण कितीही प्रगत झालो असलो, तरीही मानसिक गुलामी अजूनही आपल्यात आहे. त्याच्या बेड्या तोडण्याची ताकद हे नाटक देते. ज्या थोर विचारवंतांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविला, त्यांना
केवळ मूर्तिपूजेत अडकवायचे की त्यांचे विचार अंगीकारायचे, त्यांचे आदर्श आणि मूल्य आपण आपल्या आयुष्यात कुठे आणि कसे उतरवत आहोत, हा सवाल प्रेक्षकांना अंतर्मुख करतो. या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्त्वाला, तिच्या विचाराला जनमानसांत जागर करण्याचे काम केले जात आहे.
नाटकात हे सतत ऐकायला मिळते ती सावित्री झाली नाही? का सावित्री झाली नाही?, हा प्रश्न प्रेक्षकांना आत्मविश्लेषण करण्याची संधी देत प्रत्येकाच्या माणूस म्हणून जगण्याच्या अस्तित्वाची दखल घेतो. सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र न दर्शवता हे नाटक सावित्री स्वतःत कशी निर्माण होते यावर भर देते. माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देते. न्याय, समता आणि समानतेसाठी प्रत्येकाला रचनात्मक भूमिका घेण्यास प्रतिबद्ध करते.
९० मिनिटांच्या या नाटकात तीन स्तरांतील महिलांचे वास्तव, त्यांचे संघर्ष आणि पितृसत्ताक व्यवस्थेतील अन्याय अधोरेखित केले गेले. वडिलांच्या मालमत्तेतील मुलीच्या हक्काचा प्रश्न, स्त्रीच्या आत्मभानाचा जागर, आणि अश्विनी नांदेडकर यांनी साकारलेली तिसरी नायिका – या सर्वांनी नाटकात एक नवा उंचाव आणला. नाटकात अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, सुरेखा, साक्षी, प्रियांका कांबळे, संध्या, नृपाली जोशी, रुपवर्धिनी आणि अन्य कलाकार यांचा शक्तिशाली समूह समाजातील स्त्री-पुरुष समानतेचा उद्घोष करत मंचावर अवतरतो आणि “स्वतःमधील सावित्रीला जागवा” असा संदेश देतो. या प्रयोगाचे आयोजन भीमोत्सव समितीच्या वतीने राजेंद्र पगारे, अमोल खरे, अनिल निरभवणे, दिनकर धिवर, संजय कटारे, निलेश वाघ, डॉ. जालिंदर इंगळे यांच्यासह सभासदांच्या सक्रिय सहभागातून करण्यात आले.
मनमाड : लोक-शास्र सावित्री’ नाटक सादर करताना कलाकार