कला शिक्षक देव हिरे यांचे बाबासाहेबांना शालेय फळ्यावर रंगीत खडू माध्यमातून अनोखं अभिवादन.
“भीम पुतळ्यात नाही, भीम पुस्तकात मिळतो” या अर्थपूर्ण संदेशातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि कार्य समजून घेण्याचा नवा प्रयत्न भाटगाव (ता. चांदवड) येथील भगूर शिक्षण मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयात पाहायला मिळतो आहे. विद्यालयाचे कला शिक्षक देव हिरे यांनी साकारलेले हे सर्जनशील फळाचित्र केवळ एक कलाकृती नसून बाबासाहेबांच्या विचारांचे जिवंत दर्शन आहे.
कष्टकरींच्या प्रेरणेचं वास्तव चित्रण
या चित्रातून असंख्य कष्टकरी पालक आपली मुलं शिकवण्यासाठी झटत असल्याचं वास्तव मांडलं गेलं आहे. बाबासाहेबांनी दाखवलेल्या शिक्षणाच्या मार्गावर चालत ही मंडळी आपल्या लेकरांच्या हातात झाडू नव्हे, तर पुस्तक देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हे फळाचित्र म्हणजे त्यांना अनोख अभिवादन ठरत आहे. हे फलक रेखाटण विद्यार्थ्यांसह समाजालाही विचार करायला भाग पाडणारे ठरत आहे.