मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ –
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित करून त्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात व्हावे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. याचबरोबर दरवर्षी १७ नोव्हेंबर हा दिवस “प्रेरणादिन” म्हणून शासकीय पातळीवर साजरा व्हावा, यासाठी देखील सामाजिक व आंबेडकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून ठोस पाठपुरावा सुरू आहे.
मनमाड येथील हे विद्यार्थी वस्तीगृह सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा ऐतिहासिक केंद्रबिंदू ठरले आहे. या वास्तूची स्थापना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मनमाडमध्ये रेल्वे अस्पृश्य कामगार, युवक आणि महिला परिषद पार पडली होती. यानंतर ९ डिसेंबर १९४५ रोजी वस्तीगृहाचे भूमिपूजन झाले आणि अखेर १७ नोव्हेंबर १९५१ रोजी या वस्तीगृहाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
हीच ती ऐतिहासिक वास्तू आहे जिथे बाबासाहेबांचे वास्तव्यही होते. ही घटना मनमाडकरांसाठी अभिमानास्पद आणि स्मरणीय आहे. या वस्तीगृहामुळे हजारो दलित, मागासवर्गीय, वंचित, गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळले आहे. आज अनेक यशस्वी शासकीय अधिकारी, शिक्षक, वकील, अभियंते, डॉक्टर आणि विविध क्षेत्रात झळकणाऱ्या व्यक्ती या वस्तीगृहातूनच घडल्या आहेत.
परंतु आज हेच प्रेरणास्थळ दुर्लक्षित व जीर्ण अवस्थेत आहे, ही बाब अत्यंत दु:खदायक आणि लाजिरवाणी आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचा सन्मान राखण्यासाठी आणि तिला योग्य स्थान प्राप्त करून देण्यासाठी “प्रेरणाभूमी विकास कृती समिती”च्या वतीने पुढाकार घेतला जात आहे.
या अंतर्गत प्रेरणास्थळाची पुनर्बांधणी, सुसज्ज वसतिगृह, ग्रंथालय, संग्रहालय, महाविद्यालयाची उभारणी आणि जागेचा समर्पक सांस्कृतिक विकास करण्याची मागणी केली जात आहे. तसेच १७ नोव्हेंबर – ज्या दिवशी बाबासाहेबांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले – हा दिवस दरवर्षी “प्रेरणादिन” म्हणून साजरा करण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे.
यासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १२:०० वाजता, बुद्ध विहार, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, मनमाड येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्रेरणाभूमीच्या विकास आराखड्याची चर्चा होणार असून, पुढील शासकीय पाठपुराव्याच्या योजना ठरविल्या जाणार आहेत.
प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या वतीने सर्व आंबेडकरी अनुयायांना व मनमाडकर नागरिकांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.