मनमाड येथील बी. जी. दरगुडे पब्लिक स्कूल येथे आज अभिजात राजभाषा मराठी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षीचा मराठी गौरव दिन विशेष ठरला, कारण ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र शासनाने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ म्हणून मान्यता दिली. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व ‘मराठी अभिमान गीत’ सादरीकरणाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. शीतल आहेर यांनी केले.
यावेळी इयत्ता आठवीतील विद्यार्थी कुमारी प्रिया वाघ व अनुज दराडे यांनी ‘माझी मराठी’ या विषयावर सुंदर व प्रभावी भाषणे केली.
याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ. शोभा पगार व सौ. ज्योती शेरेकर यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. या दर्जामुळे मराठी भाषेच्या संशोधनाला, जतनाला आणि प्रचार-प्रसाराला अधिक बळ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्वांनी शुद्ध मराठी बोलण्याचा आणि मराठी पुस्तके वाचण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका सौ. श्रावणी देसाई यांनी केले. ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या सामूहिक गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेचे अध्यक्ष निलेश दरगुडे, प्रदीप दरगुडे, भागवत दरगुडे, मुख्याध्यापिका सुलताना तांबोळी व सौ. मनीषा वाघ यांनी सर्वांना अभिजात मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.












