एका खुनाची घटना ताजी असतानाच अवघ्या २४ तासात दुसऱ्या खुनाच्या घटनेने उल्हासनगर शहर हादरले आहे. फक्त मोबाईल आणि हेडफोन मागितल्याच्या कारणावरून एका मित्रानेच आपल्या मित्राचा खून केल्याची घटना शनिवारी उल्हासनगर येथे घडली. अवघ्या 24 तासात शहरात हत्येची दुसरी घटना समोर आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वर सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं. ज्ञानेश्वर हा त्याचा मित्र सुरज शिंदे आणि अन्य दोन साथीदारांसोबत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान टेकडी परिसरात दारु पिण्यासाठी गेला होता. यावेळी सुरज शिंदे याने ज्ञानेश्वर याचा मोबाईल आणि हेडफोन स्वतःकडे घेतला होता. दारु पिवून हे दोघे त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात परतत असताना सोंग्याची वाडी परिसरात ज्ञानेश्वर याने सुरज याच्याकडे आपला मोबाईल आणि हेडफोन परत मागितला.
तपासादरम्यान ज्ञानेश्वर हा रात्री सुरजसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सुरजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल आणि हेडफोनच्या वादातून आपणच ज्ञानेश्वर याची हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यानुसार सूरज याच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.












