१ ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सरकारकडून जेष्ठ नागरिकांसाठी एक विशेष भेट म्हणून शरद शतम: योजना प्रस्तावित करण्यात आल्याची घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथे पत्रकारांशी बोलताना केली. राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या नावाने राज्यातील वृद्धांसाठी हि आरोग्य योजना प्रस्तावित आहे. लवकरच तसा प्रस्ताव राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
आयुष्याच्या उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयी विविध समस्यांना सामोरे जावे लागते, परंतु अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयात जाणं शक्य होत नाही, या पार्श्वभूमीवर सगळा विचार करुन ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद पवार यांच्या नावाने आरोग्य योजना शरद शतम: योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.येत्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील सर्व वयोवृद्धांच्या आरोग्य चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. वर्षातून एकदा या सर्व चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. या चाचण्यांमुळे आजाराचे निदान वेळेवर होऊन उपचार करता येतील.
वेळोवेळी आरोग्य तपासण्या न झाल्यामुळे विविध आजार शेवटच्या टप्प्यात लक्षात येतात. त्यामुळे उपचारास विलंब होतो व रुग्ण दगावण्याचा धोका असतो. या सर्व बाबींचा विचार करुन, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा कवच योजना सुरु करण्याचा निर्णय याअगोदर घेण्यात आला आहे.













