औरंगाबाद येथील बहुचर्चित प्रा.डॉ.राजन शिंदे यांच्या खुनाचा रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. आज सकाळी डॉ.शिंदे यांच्या घराच्या जवळच असलेल्या विहिरीतून खुनासाठी वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांना सापडले. यात व्यायामाचे डंबेल्स, स्वयंपाक घरातील चाकू याचा समावेश आहे. डॉ. राजन यांच्या डोक्यात संशयित आरोपीने डंबेल्स मारले आणि त्यानंतर चाकूने गळा व हाताच्या नसा कापल्या या निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत. सर्व शस्त्र सापडताच तत्काळ एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तब्बल ७ दिवसांनंतर पोलिसांनी सबळ पुरावे जमा करत ही कारवाई केली.
हायप्रोफाईल वस्तीतील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांचा त्यांच्या घरात डोक्यात वार करून नंतर गळा, हाताच्या नसा कापून दि. ११ रोजी खुन करण्यात आला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी स्वतःकडे घेतला. विविध पथके नेमून सर्व तांत्रिक पुरावे हस्तगत करण्यात आले. दरम्यान, एका संशियाताने दिलेल्या माहितीवरून घराच्या जवळील विहिरीत खुनासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा पोलीसांनी शोध घेतला.
विहिरीतील पाणी आणि गाळ काढल्यानंतर तीन दिवसांनी आज सकाळी खुनासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे सापडली. यात व्यायामासाठी वापरायचे अंदाजे ५ किलोचे डंबेल, एक धारदार चाकू आणि रक्त पसलेले टॉवेल याचा समावेश आहे. सर्व शस्त्र सापडतच पोलिसांनी तत्काळ अल्पवयीन आरोपीला अटक केली. डॉ. राजन यांच्या डोक्यात आरोपीने डंबेल्स मारले आणि त्यानंतर चाकूने गळा व हाताच्या नसा कापल्या या निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत. त्याला विहिरीजवळ आणून पंचनामा करण्यात आला. यानंतर अल्पवयीन आरोपीस बाल न्याय मंडळात हजर करण्यात येणार आहे.












