महाराष्ट्र एसटी महामंडळातील कर्मचार्यांनी संपाची घोषणा केली होती, थकीत वेतन व महागाई भत्ता मिळावा या मागणीवर कर्मचारी ठाम होते. यावर आता परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले व आज तातडीने निधी वितरीत देखील करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निधी वितरीत करण्यात आला आहे.
दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली.
सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करता सेवा बजावली आहे. या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभे आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेतच झाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. कोरोना संकटकाळात परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली. या कठिण परिस्थितीचा विचार करता परिवहन महामंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले.













