नाशिकच्या पंचवटी परिसरात झालेल्या प्रवीण काकड या युवकाच्या खुनातील 3 मारेकऱ्यांना म्हसरुळ पोलिसांनी अटक केली आहे. वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. मृत प्रवीण काकड याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि याच वादातूनच हा खून झाल्याचे समजते.
प्रवीण हा काही दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. काही दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तींनी त्याचा निर्घृण खून केल्याची घटना पंचवटी परिसरात म्हसरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव लिंक रोडवर घडली होती. प्रवीण तरुण मित्रांसोबत रोहिणी हॉटेलजवळ मद्यपान करत बसला होता. त्याचवेळी काही अज्ञात व्यक्तींनी तेथे येऊन धारदार हत्याराने प्रवीणवर वार केले. या हल्ल्यात प्रवीणचा जागीच मृत्यू झाला होता.
प्रवीण एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्यावर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे पूर्ववैमनस्यातूनच हा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय होता. त्याच्या मृतदेहाजवळ मद्याच्या बॉटल आढळून आल्या होत्या. प्रवीणच्या खुन प्रकरणी तीन मारेकऱ्यांना म्हसरुळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा खून वर्चस्वाच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे.













