कसारा ते इगतपुरी दरम्यान चौथी आणि पाचवी रेल्वेलाईन टाकण्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाने 8 कोटी 70 लाख रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आणखी दोन रेल्वेलाइन आणि बोगदयाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी-कसारा नव्या रेल्वे लाईन साठी मागणी होती. नाशिक इगतपुरीहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ही मागणी जोर धरत होती. अखेर गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. नाशिकरोड ते मुंबई हा प्रवास जलदगतीने होण्यासाठी इगतपुरी – कसारा या दरम्यानच्या घाट क्षेत्रात सर्वच रेल्वेगाड्या कमी वेगाने धावतात. तसेच सिग्नल मिळत नसल्याने त्यांना सक्तीचा थांबा घ्यावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी कसारा ते इगतपुरी या दरम्यान चौथी आणि पाचवी रेल्वेलाईन टाकण्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वित्त संचालनालयाने आठ कोटी सत्तर लाख रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे दोन नवीन रेल्वेमार्ग आणि बोगदयाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.