डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्र. 4 रहिवाशांना भोगवटदार वर्ग 2 चे उतारे मिळावे व या प्रभागातील रहिवाशांना स्वतःचे हक्काचे पक्के घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना गुरुकुमार निकाळे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.
मनमाड शहरात 100 वर्ष जुनी अधिकृत झोपडपट्टी वसाहत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्र. 4 विभागाची नगरपालिकेत नोंद आहे. प्रभाग क्र.4 डॉ. आंबेडकर चौक संपूर्ण परिसर हा दलित वस्तीचा आहे. याठिकाणी निवासी अतिक्रमणे आहे. दलित प्रवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतात. त्या योजनेव्दारे दलित प्रवर्गातील जीवनमान उंचवावे हा प्रमुख उद्देश असतो. या भागातील मागासवर्गिय समाजाची बऱ्याच कुटुंबाची कच्ची घरे अस्तित्वात असल्याने त्यांना पक्की घरे मिळावी म्हणून पंतप्रधान आवास योजनेव्दारे गरीबांना स्वतःच्या हक्काचे घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी ही योजना आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी जागेचा 7/12 उतारा असणे अनिवार्य असून त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्र. 4 विभागातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणे असल्यामुळे शासनाच्या पंतप्रधान आवास योजना व इतर घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही.
मागासवर्गीय कुटुंबाना स्वतःचे पक्के घर मिळावे याकरीता शासन अध्यादेश दि. 27 नोव्हेंबर 2018 क्रमांक एमयुएन- 2018 / प्र.क्र. 197/नवि-18 या नुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे कायम करुन भोगवटादार वर्ग 2 नुसार उतारा पट्टी लागू करण्यात यावी. या संदर्भात मी वेळोवेळी मनमाड नगरपालिका व भुमिअभिलेख कार्यालय नांदगाव यांना पत्रव्यहार करुन व अमरण उपोषण व आंदोलन करुन सदर प्रभागातील जागेची मोजणी करण्याकामी चलन भरण्यास भाग पाडले. मात्र भुमिअभिलेख कार्यालय नांदगाव यांच याकामात सातत्याने दिरंगाई होत असून शासकीय काम अत्यंत संथ गतीने सुरु असून येथील रहिवाशांना भोगवटदार वर्ग 2 चे उतारे मिळावे व या प्रभागातील रहिवाशांना स्वतःचे हक्काचे पक्के घराचे स्वप्न पूर्ण होणेकामी आपल्यास्तरावरुन संबंधीतांना आदेशित करुन कामास गती द्यावी असे निवेदन गुरु कुमार निकाळे यांच्यातर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना देण्यात आले.