नाशिक (प्रतिनिधी)
दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जात असतो.बाबासाहेबांचे पहिले शैक्षणिक पाऊल पडलेल्या सातारच्या शाळेत त्यांना दरवर्षी मानवंदना दिली जाते,बाबासाहेबांच्या कार्याची कीर्ती ही जगभरच असली आणि अगदी कोलंबिया विद्यापीठातही त्यांचे स्मारक असले, तरी ज्या साताऱ्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले शैक्षणिक पाऊल पडले त्या सातारच्या मातीसाठी ही अभिमानाची आणि गौरवाचीच बाब आहे.७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल मध्ये (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जात असतो.त्या दरम्यान शाळांना दिवाळी सुट्ट्या असतात म्हणून शाळा-महाविद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवशी विद्यार्थी दिन साजरा व्हावा असे मागणी राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी सरकार कडे निवेदनाद्वारे केले आहे.
जगाने ज्ञानाचे प्रतिक म्हणून गौरविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन हा २०१७ पासून राज्यभर ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचे परिपत्रक काढले तेव्हापासूनच या दिवसाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असा संदेश देणारे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही अशी गर्जना करणारे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्रोत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासात सातारच्या मातीपासून ते अगदी परदेशातून धडे गिरवले, प्रबंध लिहिले. जीवनात शैक्षणिक क्रांती घडल्यास मोठी किमया होते ती कशी, याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर जगासाठी प्रेरणास्रोत बनलेले आहेत.
सातारच्या शाळेत त्यांनी ७ नोव्हेंबर १९०० ते १९०४ पर्यंत इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता चौथीपर्यंत इंग्रजीतून शिक्षण घेतले.आजही शाळेच्या रजिस्टर मध्ये १९१४ या अनुक्रमांकावर भिवा हे नाव पाहायला मिळते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ हे सेवानिवृत्त झाल्यावर साताऱ्यात लष्करी भागात राहायला आले होते.भिवाच्या शिक्षणाचा प्रवास हा खडतर असाच होता.जातीयता आणि अस्पृश्यतेने इथली समाज व्यवस्था माणसा माणसाला माणसापासून दूर लोटत असताना यातून मार्ग काढत एक शैक्षणिक संघर्ष चालू होता.आज हाच संघर्ष नव्या परिवर्तनाची नांदी बनला.बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाची व त्यांनी केलेल्या परिवर्तनवादी कार्याची ख्याती जगभर पसरलेली आहे.
देशाचे संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांसारख्या ज्ञानी विद्यार्थ्याचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे. डॉ. आंबेडकरांनी संघर्षमय असाच शैक्षणिक प्रवास केलेला आहे हे जगाला ज्ञात आहे. बाबासाहेबांचे हे कार्य विद्यार्थ्यांमध्ये नेण्यासाठी विविध उपक्रम घेऊन दिवाळी नंतरच्या सुट्ट्यांनंतर सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवशी देशातील सर्वच शाळा-महाविद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवशी विद्यार्थी दिन साजरा व्हावा अशी मागणी राष्ट्रीय बालक विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
डॉ.बाबासाहेब हे आजच्या विद्यार्थ्यांना कळणे गरजेचे आहे.विद्यार्थी हित व त्यांचे शिक्षण विषयक प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी बाबासाहेब हे मार्गदर्शक ठरणारे आहेत याचे चिंतन मनन व अनुसरण केले जावे.शाळाबाह्य मुले,झपाट्याने कमी पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद करण्याचे षडयंत्र,खाजगी-स्वयंम अर्थसाहित शाळांची दुकानदारी,शाळा व्यवस्थापन पालक समित्या यांचा शाळा सुधारणांनामध्ये सहभाग,पालक-माता मेळावे,बैठका नियोजन व शिक्षणाविषयी जाणीव जागृती या विषयी विद्यार्थी दिनाच्या दिवशी उपक्रम राबविले जावेत अशी मागणी शरद शेजवळ, विनोद पानसरे,वनिता सरोदे-पगारे यांनी केली आहे.
आपला
शरद शेजवळ
9822645796














