छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुण सरपंचांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ज्यात एका शासकीय कार्यालयासमोर नोटा उधळताना पाहायला मिळत आहे. फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या समोरील हा व्हिडिओ असून, मंगेश साबळे असे या तरुण सरपंचाचे नाव आहे. गटविकास अधिकारी यांनी विहीर मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याने, त्यांच्या कार्यालयासमोर दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्याचा दावा या सरपंचांने केला आहे. विशेष म्हणजे त्याने गळ्यात नोटांचा हार घालत पंचायत समिती कार्यालयाच्या गेटवर पैसे उधळले आहे.
वेगवेगळ्या शासकीय योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान दिले जाते. सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या योजनेसाठी शेतकरी अर्ज करत आहे. मात्र फुलंब्री तालुक्यात अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान असेच काही फुलंब्री तालुक्यातील गेवराई (पायगा) येथील गावकऱ्यांसोबत घडत असल्याचा आरोप या गावचा सरपंच मंगेश साबळे याने केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने अनोखे आंदोलन केले आहे. तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटाचा हार गळ्यात घालून तो पंचायत समितीच्या कार्यालयात दाखल झाला. त्यानंतर त्या नोटा कार्यालयाच्या परिसरात उधळून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेध करत असल्याचा दावा केला आहे.