प्रत्येक सभेत खोके, गद्दार, खंजीर हेच शब्द निघतात, मालेगावमध्ये सभा झाल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी रास्त मागणी केली, त्यामुळे नार्को टेस्ट केली की खोके कोणाकडून आले, कुणाकडे गेले हे समजेल, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ज्यांना खोक्यांची सवय आहे, त्यांना खोकेच दिसत असल्याची टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली.
नाशिक शहरातील मायको सर्कल परिसरात नाशिक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, भाऊसाहेब चौधरी आणि ईतर पदाधिकारी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी यावेळी हजेरी लावली होती. दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी भाषणात बोलतांना एकदा नार्को टेस्ट कराच, कोणाकडे किती खोके आहेत हे समजेल असं म्हणत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. रोज उठले की सध्या एकच भाषण सध्या सुरू आहे. त्या भाषणात शब्द देखील एकच आहेत, खोके, गद्दार आणि खंजीर या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही, त्यामुळे लक्ष देणं बंद करा असं आवाहनच शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्याना दिले आहे.
आज शिवसेना या शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले कि, या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटतील, राज्यातील लोकांना आता मुख्यमंत्री आणि सरकारबद्दल विश्वास आहे. या सर्वांच्या विश्वासावर हे कार्यालय पात्र ठरणार आहे. समस्यांचे निवारण आणि वेगवेगळे सेल या कार्यालयात असणार आहेत. आज एक भव्य दिव्य शिवसेना कार्यालय नाशिकमध्ये तयार करण्यात आले असून या कार्यालयात अनेक वेगवेगळे कक्ष आहेत. त्याचा लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर शिंदे भाजप सरकारने अनेक योजना आणल्या. गेल्या 9 महिन्यात चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. सर्वासाठी फायद्याचे बजेट यावेळी सादर करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.