नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील महिनाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच अयोध्या दौऱ्यावरून आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर नाशिक तालुक्यात पाहणी दौऱ्यावर आहेत.
नाशिकसह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने रविवारी अक्षरशः झोडपून काढले आहे. नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील सटाणा (Satana), देवळा, नांदगाव, सिन्नर आदी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. वादळी वाऱ्यासह गारांच्या वर्षांवासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. अशातच अनेक भागात शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर होते. अशातच काल राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकसह जिल्ह्यातही नांदगाव,बागलाण चांदवड, देवळा,सिन्नर येथे वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा बंद झाला तर झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने वाहतूक देखील बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
नांदगाव तालुक्यात अगोदर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अगोदर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.