चांदवड तालुक्यातील बोराळे ग्राम पंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाने लोखंडी जिन्याच्या कामाचे पैसे देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपये प्रत्येकी लाच मागितली. ही लाच स्विकारताना या कंत्राटी ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडुन बेड्या ठोकल्या.
६२ वर्षीय पुरुष तक्रारदाराने चांदवड तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीच्या लोखंडी जिन्याचे काम ५० हजार रुपयांत घेतले होते. या कामाच्या मोबदल्यातील उर्वरित २० हजार रुपये त्यांना अपेक्षित होते. मात्र, याच ग्रामपंचायतीचा कंत्राटी ग्रामसेवक (वर्ग ३) आतिश अभिमान शेवाळे आणि सरपंच बाकेराव भाऊसाहेब जाधव (वय ५०) यांनी हे पैसे त्यांना देण्यासाठी प्रत्येकी ७ हजार पाचशे रुपयांप्रमाणे १५ हजार रुपयांची लाच मागितली. ही लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष स्वीकारताना या कंत्राटी ग्रामसेवकास रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्त व सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या समक्ष ही लाच स्विकारताना कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस नाईक शरद हेंबाडे, पोलीस नाईक राजेंद्र गिते, चालक पोलीस नाईक परशराम जाधव यांच्या पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.