नांदगाव
नांदगाव शहरातील आनंदनगर येथे दारू पिऊन आई-वडिलांना त्रास देत असल्याच्या कारणाने मेहुण्याने शालकाच्या डोक्यात लोखंडी हातोडीने घाव घालीत ठार मारल्याची घटना मंगळवारी(दि.१६)रोजी रात्री घडली असून संशयित खुनाचा आरोप असलेला आरोपी नगरपालिका शाळेचा मुख्याध्यापक असल्याने घटनेची नांदगाव शहरात दिवसभर चर्चा होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेला वाल्मीक साहेबराव ठाकूर(३५) हा सुरत येथे खाजगी नोकरीला होता काही दिवसांपूर्वी तो आपल्या स्वतःच्या घरी नांदगावी आला होता. त्यावेळी त्याने दारुच्या नशेत आई वडिलांना मारहाण केली होती. मंगळवारी(दि.१६ ) त्याचे मेहुणे ईश्वर देवराम ठाकुर व चुलत भाऊ प्रदीप निवृत्ती ठाकुर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता वाल्मिकची दोघांशी बाचाबाची झाली होती. त्यानंतर आरोपी ईश्वर ठाकुर याने प्रदीपला मी याला माझ्या पध्दतीने समजावतो असे सांगितले. घरी परतल्यावर प्रदीपला शेजारील काकांच्या घरातून ओरडण्याचा आवाज आल्याने त्याने जाऊन पाहिले असता आरोपी शालकाच्या डोक्यावर व पायावर हतोड्याने घाव घालत होता. यावेळी आरोपीने प्रदीपला कुणाला काहीही सांगितले तर तुझीही अशी अवस्थेत करेल असा दम भरला. अर्ध्या तासानंतर आरोपीने रुग्णवाहिका बोलावून वाल्मीकला ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अशी फिर्याद प्रदीप ठाकुर याने नांदगाव पोलिसांत दिली आहे.
उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट देत सूचना केल्या. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरडकर, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील, पोलीस हवालदार रवींद्र चौधरी, सागर कुमावत, भारत कांदळकर, नंदकिशोर पिंपळे घटनेचा तपस करत आहे.