गणेश विर्सजन व महमंद पैगंबर जंयती एकाच दिवशी असल्याने
महमंद पैगंबर जंयती दुसऱ्या दिवशी २९ ला साजरी होणार
नांदगाव सोमनाथ घोगांणे
गणेश विसर्जन व महंमद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलादुन्नबी एकाच दिवशी आल्याने दोन्ही मिरवणुका एकाच दिवशी निघाल्या तर प्रशासन व पोलीस यंत्रणेवर तणाव वाढू शकतो याची दखल घेऊन मुस्लीम बांधवांचे प्रमुख कार्यकर्ते यांनी नांदगाव पोलीस स्टेशनला अर्ज देऊन गणेश विसर्जनाच्या पुढच्या दिवशी २९ सप्टेंबर रोजी आपला सण साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे शहरात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक प्रीतमकुमार चौधरी यांनी याकामी पुढाकार घेतला होता.
देशात इतरत्र झालेल्या घटनांचे पडसाद नांदगाव शहरात यापूर्वी हिंदू मुस्लीम यांनी एकत्र येत उमटू दिलेले नाहीत असा इतिहास आहे. पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत ‘प्रेमाने एकोपा रहावा’ यासाठी समाजाने पहिले पाउल उचलले आहे असे मत मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी व्यक्त केले. गणेशोत्सव व ईद ए मिलादुन्नबी या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आज बुधवार (दि. ०६ सप्टेंबर ) रोजी होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी हा निर्णय जाहीर करण्यात आला. नांदगाव शहरात हिंदू मुस्लीम एकमेकांच्या चालीरीतीना सहकार्य करतात याची उदाहरणे बैठकीत नमूद करण्यात आली.
मुस्लीम चांद्र कॅलेंडरच्या १२ तारखेला म्हणजे २८ सप्टेंबर रोजी ईद ए मिलादुन्नबी आहे. परंतु त्यादिवशी गणेश विसर्जन आहे. यानिमिताने रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मुस्लीम समाजाने आपला सण २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला त्याला सर्व धर्मियांनी पाठिंबा दिला आहे. पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत अध्यक्ष नासीर पठान, याकुब शेख, बबलू सैय्यद, अकील्भाई मास्तर, अय्याज शेख, कलीम शेख, सिद भाई, मुश्ताक भंगारवाले, इम्रानभाई आदी उपस्थित होते.








