नांदगाव सोमनाथ घोगांणे
गिरणा डॅम नांदगाव बसचा
स्टिअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बस जामदरी फाट्याजवळ रस्त्याच्या खाली उतरल्याने झालेल्या अपघातात बस चालक शांताराम सोनवणे, वाहक योगेश गरुड, पंधरा शालेय विद्यार्थी यांच्यासह पंचवीस प्रवासी जखमी झाले.
याबाबत वाहक गरुड यांनी दिलेल्या माहितीनुसार जामदरी फाट्याजवळ गिरणा डॅम बस क्र.एम. एच. १४ बी.टी. ३८०६ नाल्यात उतरल्याने मोठा आवाज झाला व काही समजण्याच्या आत सर्व प्रवासी जोराने बसमध्ये आदळले. यावेळी मी तिकीट फाडून नुकताच माझ्या सीटवर बसलो होतो काही समजण्या आधी मीही समोरच्या रॉडवर जोराने आदळलो डोक्याला चांगलाच मार लागला होता या परिस्थितीत स्वतःला सावरत परिसरातील नातलगांना अपघाताची माहिती दिली ते तत्काळ घटनास्थळी आले त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना खाली उतरविले. वीस पंचवीस मिनिटात दोन रुग्णवाहिका अपघातस्थळी आल्या, काही जखमी वर जागेवर उपचार करुन तातडीने आम्हाला सर्वांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. असे सांगितले.
अपघातग्रस्त बसमध्ये पन्नास ते पंचावन्न प्रवासी होते त्यापैकी शशिकांत कारभारी हरळे वय ६०, पायल नाना हरळे वय १४, सिद्धी विनायक पाटील वय १५, रंजना सोनवणे, लक्ष्मीबाई भाऊसाहेब चव्हाण वय ३५, बापू देवमन पगार वय ६५, स्वप्नील आहेर सर्व राहणार मळगाव व वाहक योगेश गरुड, सुरेखा पाटील यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले. अपघातातील इतर जखमींवर प्रथमोपचार करून डिस्चार्ज देण्यात आला











