नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगावची सुकन्या पुजा नारायण दंडगव्हाळ हिचा इस्त्रोच्या चांद्रयान मोहीमेत सहभाग तिच्याच शब्दात
धूळ उडाली आणि उत्सुकता ताणली गेली. काही तासांच्या प्रतीक्षेनंतर वातावरण स्वच्छ झाले. रोव्हरचे दार उघडून आमचा प्रग्यान खाली उतरला. त्याक्षणी खूप खूप मस्त वाटल.माझं, माझ्या टीमच काम अखेर चंद्रावर पोहोचल होत. डोळ्यांमधून आनंदाश्रू ओघळले. त्याक्षणी पप्पांची जबरदस्त आठवण झाली. आयुष्यात वेगळ करून दाखव… ही त्यांची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान मनात दाटून आले.
आता पुढचा क्षण अजून भावनिक होता. म्हणतात ना बाळाचे पाय… तसे प्रग्यान हे आमचे बाळच आहे…..चाकाच्या प्रत्येक फेरी बरोबर,त्यावर कोरलेले अशोकस्तंभ आणि इस्रोचा लोगो, पुढच्या चौदा दिवसात, चंद्राच्या मातीवर आपले शेकडो ठसे उमटवणार होते. तो क्षण आला….प्रग्यानची चाके चंद्रभूमीवर फिरू लागली पावला गणिक ठसे उमटवत जातांना भारताचा सातबारा तयार होत गेला… इतिहासाचा नवा अध्याय लिहीला गेला. चाकावरील लोगोचे डिझाईन व इतर उपकरणे बनविण्यात आमचा सहभाग होता. ते टीम वर्क होते. बंगलोरस्थित इस्त्रोच्या इमारतीच्या खिडकीतून दिसणारा चंद्र आणि आमच्या समोर लावलेल्या मोठ्या स्क्रीन मध्ये दिसणारे रोव्हर आणि प्रग्यान… हे दृश्य बघताना आम्ही शास्त्रज्ञ हरखून गेलो होतो.
पप्पांना फोन लावला….. तो आयुष्यातला आनंदाचा परमोच्च क्षण होता. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाच्या बळावर मी खासगी कंपनीतली नोकरी सोडून इस्रो मध्ये दाखल झाले होते. त्याचे सार्थक झाले. आयटीआय झाल्यावर इस्रोत नोकरी करत असतांना रात्रीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंजिनियरिंग मधला डिप्लोमा पूर्ण केला. आज इस्रोमध्ये मी टेक्निकल असिस्टंट पदावर आहे. वडील नारायण दंडगव्हाळ यांच्या आयुष्यातला बहुतांश काळ नांदगाव मध्ये गेला. त्यांचे संस्कार माझ्यावर झाले. अशी माहिती पूजा यांनी दिली.
इस्रोत काम करणे कठीण असते. प्रत्येक तीन वर्षानंतर इंटरव्ह्यू होतो. १५ जणांची टीम इंटरव्ह्यू घेते. ड्रॉइंग, डिझाईन, ३ डी मॉडेलिंग, फँब्रीकेशन, व्हँक्युम, टेस्टिंग अशा विवध टप्यातून गेल्यावर अंतिम मॉडेल तयार होते. पदोन्नती कामाशी, कार्यक्षमतेशी सलग्न असते हे महत्वाचे आहे.
चांगला अभ्यास करा, नाविन्याचा ध्यास घ्या, खूप काम करा, फळ व आनंद नक्कीच मिळेल असे शेवटी पूजा दंडगव्हाळ(यू. आर. राव सँटेलाईट सेंटर (ISRO) यांनी सांगितले.














