मनमाड : ( योगेश म्हस्के )श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’
या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते. या दिवशी त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल , सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे,
आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.सायंकाळी गावाच्या सीमेजवळ एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात.
मनमाड शहर आणि परिसरात देखील पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला , शहरातील बुधलवाडी , दरगुडे वस्ती , वेशीतील मारुती मंदिर येथे शेतकरी बंधवांकडून आपल्या सर्जा -राजाला सजवुन , मारुती मंदिरासमोर मानवंदना देऊन वाजत गाजत पोळा सण साजरा केला करण्यात आला.
















