मनमाड : ( योगेश म्हस्के)आज पासुन गणेशोत्सवास सुरवात झाली असुन , शहरातील गणेश भक्तांकडुन आपल्या लाडक्या बाप्पाचे भक्तीमय वातावरणामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साजऱ्या करण्यासाठी गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.आज सकाळ पासुनच बाजार पेठेमध्ये श्री गणपती मुर्ती , बाप्पाची आरस बनवण्यासाठी सजावटीचे साहित्य , पुजेची साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.शहरातील काही सार्वजनिक मंडळाच्या वतीने काल सायंकाळी बाप्पाचा आगमन सोहळा साजरा करण्यात आला.
गेल्या 25 वर्षांपासून देशातील एकमेव असणारा धावत्या रेल्वेत साजरा करण्यात येणारा गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाचा ‘गोदावरीचा राजा’ची यंदाच्या वर्षी मनमाड ते मुंबई धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडी मधील सजवलेल्या बोगीमध्ये स्थापना करण्यात आली . मनमाड शहराचे आराध्य दैवत वेशीतील मानाचा श्री निलमणी गणेश मंदिरामध्ये आज सकाळी ढोल ताशांच्या गजरामध्ये पारंपरिक पद्धतीने बाप्पाची मिरवणूक काढुन विधिवत पुजा करून स्थापना करण्यात आली.
शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे , घरगुती गणेश उत्सव येत्या दहा दिवसात अनेक उपक्रमाद्वारे मोठ्या भक्ती-भावाने गणेशभक्तांकडुन साजरा करण्यात येणार आहे.






























