मनमाड : योगेश म्हस्के – शहरातील गणेश भक्तांकडुन आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्ती-भावाने निरोप देण्यात आला , घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही उत्साह दिसून येत होता. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांच्या वतीने भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा संपन्न झाला.
शहरामध्ये काल विसर्जन सोहळ्या प्रसंगी लहान-मोठया गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते , नागरिकांनी आपल्या बाप्पाचे अत्यंत मनोभावे विसर्जन पार पाडले. सकाळी मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि वेशीतील मानाचा गणपती श्री निलमणी गणेशाची पारंपरिक पद्धतीच्या मिरवणूकने विसर्जन सोहळा संपन्न झाला. शहरातील अनेक मानाची गणेश मंडळे , घरगुती गणपती यांचे मध्यरात्री पर्यंत गणेशकुंड येथे विसर्जन संपन्न झाले.
यंदाच्या वर्षीच्या विसर्जन सोहळ्यामध्ये सर्वात आगळी-वेगळी विसर्जन मिरवणूक ठरली ती गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाच्या ‘गोदावरीचा राजा’ गणपतीची , गेल्या 27 वर्षांपासून मनमाड ते मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांकडुन कदाचित देशातील एकमेव असणारा चालत्या प्रवासी रेल्वेगाडी मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे , यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने तीन चाकी सायकल रिक्षा वरती आकर्षक अशी सजावट करून बाप्पा विराजमान केले होते तर हा रथ चालवण्यासाठी चक्क मुशकराज रथाचे सारथ्य करत होते .या मिरवणुकी मध्ये पारंपरिक ढोल पथक , बँड पथक , घोडे आणि मंडळाच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी पारंपारिक वेषभूषा करून बाप्पाची अत्यंत सुंदर आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढुन मनमाडकरांची मने जिंकली.










































