नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात गेल्या सहाच दिवसापूर्वीच एका पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या साह्याने आपल्याच दारूड्या नवऱ्याचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा न्यायडोंगरी गावात दुसरा खूनाचा गुन्हा दाखल झाल्याने न्यायडोंगरी हादरून गेली आहे .
मयत डॉक्टर भाग्यश्री किशोर शेवाळे वय वर्ष २७ राहणार न्यायडोंगरी हीचा दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून (खून ) जिवे ठार मारले अशी फिर्याद मयत डॉक्टर भाग्यश्री किशोर शेवाळे हीचा भाऊ सचिन कैलास साळुंखे राहणार तितरखेडा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर हल्ली मुक्काम रॉयल लॉन्स च्या बाजूला वाळुंज तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सी. सी. टी एन . एस ४४५/२०२३ भादवी कलम ३०२,३०४ (ब) ३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या पाच ऑक्टोबर रोजी न्यायडोंगरी गावात एका पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या सहाय्याने नवऱ्याला ठार केले तर आजच्या या गुन्ह्यात डॉक्टर नवऱ्याने त्याच्या बापाच्या सहाय्याने डॉक्टर असलेली पत्नी भाग्यश्री हिला दगडाने ठेचून ठार मारले अशा आशयाची फिर्याद दिल्याने न्यायडोंगरी गावात उलट सुलट चर्चेला उधानआले आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की गेल्या २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते रात्री अकरा चे दरम्यान मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याचा बनाव करून डॉक्टर भाग्यश्री ही मयत झाल्याचे सांगितल्याने चाळीसगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू गुन्हा नंबर ००/२०२३ सी . आर. पी. सी १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु सदरचे घटनास्थळ नांदगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत असल्याने सदरचा गुन्हा ०० नंबर ने नांदगाव येथे वर्ग करण्यात आला होता, परंतु काल तब्बल १५ दिवसानंतर मयत डॉक्टर भाग्यश्री हिचा भाऊ सचिन कैलास साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझी बहीण भाग्यश्री हिच्याकडे पती डॉक्टर किशोर नंदू शेवाळे व तिचे सासरे नंदू राघो शेवाळे हे नेहमी तू तुझ्या माहेरून घर व दवाखाना बांधण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन ये अशी मागणी वेळोवेळी करीत होते परंतु सदरची मागणी भाग्यश्री हिच्याकडून पूर्ण न झाल्याने केवळ पंचवीस लाख रुपयांसाठी आरोपी डॉ किशोर नंदू शेवाळे व त्यांचे वडील नंदू राघो शेवाळे यांनी संगनमताने व विचारपूर्वक फिर्यादीची बहीण डॉक्टर भाग्यश्री हिस दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून जीवे ठार मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास उप उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी उपनिरीक्षक नितीन खंडागळे, मनोज वाघमारे, संतोष बहाकर हे करीत आहेत.










