अखेर बंगलोर चा निसर्ग न्यूझीलंडवर मेहेरबान झाला. ज्या बंगलोर च्या पावसाने 400 रन्स काढूनही न्यूझीलंड ला पाकिस्तान विरुद्ध डकवर्थ लुईस या किमयागाराच्या मदतीने पराभूत केलं होतं…तोच पाऊस आज जणू न्यूझीलंड ला शरण येऊन म्हणाला.” सॉरी , आता परत नाही” आणि पावसाने सुटी घेऊन न्यूझीलंड ला वर्ल्ड कप च्या सेमी फायनल च्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आणि पाकिस्तान चे सेमी फायनल ला जाणे अगदीच अवघड करून टाकले. तसे पाहिले तर न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात न्यूझीलंड चे पारडे जड आहे हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हतीच…पण पाऊस निर्णायक ठरणार होता. पाऊस वेळेवर चिंना स्वामी बंगलोर स्टेडियम वर पोहचलाच नाही, त्या श्रीलंकन मॅथ्यूज सारखाच जणू तो येण्या आधीच time out झाला. आणि न्यूझीलंड चे गणित सोपे तर पाकिस्तान समोर मोठे अवघड समीकरण ठेऊन गेला. 128 वर 9 विकेट ही श्रीलंकेची स्थिती फुसक्या फटाक्यासारखीच होती. पण शेवटच्या जोडीने थोडी सुरसुरी लावून आव्हानांत जान आणली. 172 धावांचे छोटे टार्गेट पण न्यूझीलंड फलंदाज रन रेट चा हिशेब डोक्यात ठेऊन खेळले, त्यांचा प्रत्येक फटका पाकिस्तान च्या सेमी च्या अपेक्षांना सुरुंग लावणारा ठरला. भारतात दिवाळी सुरू आहे, बंगलोर च्या मैदानात न्यूझीलंड ने दिवाळीत आतषबाजी करत विजयाचा फुलबाजा उडवला. आता
या विश्वचषक स्पर्धेतून श्रीलंका,इंग्लंड, नेदरलँड, आणि अफगाणिस्तान यांनी गाशा गुंडाळला आहे. भारत,दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया हुशार मुलासारखे मेरिट मध्ये आलेय..तर
पाकिस्तान ला अवघड पेपर
पाकिस्तान ला सेमी फायनल ला पोहचण्यासाठी बोर्डाचे एका दिवसात सर्व विषयांचे जवळपास 10 पेपर देणे जितके अशक्यप्राय इतके अवघड गणित झाले आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यात पाकिस्तान ला इंग्लंडला 287 रन्स नी हरवावे लागणार आहे ,किंवा इंग्लंड ने कितीही रन केले तरी ते पाकिस्तान ला फक्त आणि फक्त 4 ओव्हर आणि एका चेंडूत म्हणजे 25 बॉल मध्ये करायचे आहेत. इंग्लंड विरुद्ध पहिली बॅटिंग असेल तरच पाकिस्तान ला थोडे फार विजयासाठी हात पाय हलवता येणार आहे,पण ते ही अशक्य प्राय आहे. पाकिस्तान ने 300 धावा काढल्या तरी त्यांना इंग्लंड ला फक्त 13 धावात ऑल आऊट करायचे आहे, आणि ही गोष्ट दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. पाकिस्तान ने 400 धावा काढल्या तर इंग्लंडला 112 धावात तंबूत परत पाठवण्याचे मुश्किल आव्हान पाकिस्तान समोर आहे. न्यूझीलंड ने बंगलोर ला श्रीलंकेला हरवून पाकिस्तानला सत्व परीक्षेला नेऊन बसवले आहे. आता पाकिस्तान या परीक्षेला कसे सामोरे जातो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. न्यूझीलंड ने जाता जाता भारतीयांना पण दे धक्का दिला आहे, चवथ्या क्रमांकावर येऊन आता सेमी फायनल ला न्यूझीलंड भारताशी झुंजेल,असे चित्र आता तरी आहे. भारतीयांनो, करा तयारी त्या फॉर्मातल्या राचीन , मिचेल ,आणि विल्यम्सनच्या बॅटिंग च्या मुसक्या बांधण्याची…आणि बोल्ट, साउदी, फिलिप या तोफखान्याला चारी मुंड्या चित करण्याची….. राचीन ,सोधी, सॅटनर च्या फिरकीची धुलाई करण्याची..….. पाकिस्तान ने एखादी जादू, अद्भुत चमत्कार केला नाही तर भारताला
हे करावेच लागणार…तेव्हा शुभस्य शीघ्रम टीम इंडिया….