मनमाड : योगेश म्हस्के राम…राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममाण करणारा. ‘श्री’ हे भगवंताच्या षड्गुणांपैकी एक आहे. असे अयोध्येचे श्रीराम हे राजा दशरथ व त्यांची प्रथम पत्नी कौसल्या यांचे पुत्र होते. चैत्र शुक्ल नवमीला, दुपारी बारा वाजता कडक उन्हाच्या प्रहारात श्रीरामाचा जन्म झाला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. राम आणि कृष्ण भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे केंद्रबिंदू आहेत.
दरवर्षी भाविक हे श्री राम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करतात. कारण, त्यांचा जन्म आणि जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन केले आहे. सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादेत राहूनही पुरूष ‘उत्तम’ कसा होऊ शकतो. याची प्रचिती आपल्याला ‘मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाच्या’ जीवनामुळे येते. मानव महत्त्वाकांक्षा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली प्रगती करू शकतो. विकार, विचार आणि व्यावहारीक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना ‘मर्यादा पुरूषोत्तम’ असे म्हटले जाते.
मनमाड शहरामध्ये यंदाच्या वर्षी प्रभु श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला , शहरातील आठवडे बाजार येथील पुरातन श्रीराम मंदिर , रेल्वे स्टेशन समोरील श्री राम मंदिर , श्री दत्त मंदिर, गांधी चौक मित्र मंडळ , मुरलीधर मंदिर येथे राम जन्मोत्सव निमित्ताने दत्तोपासक मंडळाची भजन सेवा संपन्न झाली तसेच शहरातील अनेक मंदिरे आणि मंडळाच्या वतीने प्रभु श्री राम जन्मोत्सवा निमित्ताने अभिषेक पुजन , दुपारी बारा वाजता जन्माचा पाळणा म्हणुन महाआरती , भाविकांसाठी महाप्रसाद आणि अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते , सायंकाळी श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने आठवडे बाजारातील प्रभु श्री राम मंदिरापासुन ते शहरातील प्रमुख मार्गाने भव्य स्वरूपातील रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या रथ यात्रेमध्ये श्री राम जन्मउत्सव समितीचे सर्व पदाधिकारी , सदस्य , श्री रामभक्त आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.