नांदगाव -: हजारो जनसमुदयाच्या साक्षीने नांदगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुहास कांदे यांनी दि २९ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्या सोबत भाजपच्या माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार,जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार संजय पवार, माजी आमदार राजेंद्र देशमुख,सौ. अंजुमताई कांदे यांच्यासह शिवसेना, भाजप, व रिपाई चे वरिष्ठ नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्याने निर्माण झालेल्या शिवसृष्टीवर येथे महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर रॅलीस सुरुवात झाली.मनमाड -चाळीसगाव महामार्गाने ही रॅली जैन धर्म शाळेपासून नगरपरिषद आवाराकडे निघाली असता,या मार्गांवर असलेल्या संत सावता महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवाजी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ही पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बाजार रोड, अहिल्या चौकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या होळकर शाही घराण्याचे राजमुद्रेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महात्मा फुले चौकात महात्मा फुले, त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ह्या रॅली चे जुन्या तहसील कार्यालयाजवळ सभेत रूपांतर झाले.
यावेळी महायुतीचे उमेदवार सुहास कांदे म्हणाले की, मनमाड करंजवन पाणी योजना, नांदगाव गिरणा धरण पाणी योजना, ७८ खेडी पाणी योजना,आशिया खंडातील एकमाद्वितीय शिवसृष्टी, महर्षी वाल्मिकी स्टेडियम,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,छत्रपती शिवाजी महाराज,यांचे स्मारक,अगणित सभामंडप, इदगाह, अनेक गावात शादीखाना,अनेक गावांत जलजीवन योजना,या शासकीय निधीतून झालेल्या विकासकामांसह वैयक्तिक स्वखर्चाने एक लाख चष्मे वाटप, ३० हजार डोळ्यांची शस्त्रक्रिया, अनेक आपदग्रस्त कुटुंबांना आर्थिक, अन्नधान्य, कपडे आदी मदत, ही कामे केली आहेत.असे महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यावेळी म्हणाले.
मात्र मिळालेल्या अडीच वर्षात सुमारे साडे तीन हजार कोटीची विकासकामे खेचून आणली. याउलट भुजबळ कुटूंबाला दहा वर्षे सत्ता मिळुनही दोन इमारती बांधण्या पलीकडे त्यांचा विकास गेला नाही.आज अपक्ष उमेदवारी करून जनतेला भुलथापा देत आहेत. तरी पुन्हा संधी द्या, आता तालुक्यातील शेतीच्या जलसिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढची कारकीर्द घालवेन असा शब्द देतो असे ही कांदे म्हणाले.
यावेळी विरोधकांनी काही उमेदवार मुद्दाम उभे केले आहेत. मात्र जनता हुशार आहे. ती जातीपातीच्या राजकारणाला थारा देणार नाही. ती विकासासोबतच राहील असा माझा ठाम विश्वास आहे. असे ही आहे.या तालुक्याची सेवा करत असताना मी कुटूंबाकडे ही लक्ष दिले नाही. माझा क्षण न क्षण या मतदार संघांसाठी अजून काय काय करता येईल यासाठीच घालवला.असे सांगताना सुहास कांदे अत्यंत भावुक झाले होते. व त्यांच्या डोळ्यातून अश्रू ही तरळले.
तत्पूर्वी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार,जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार संजय पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी आमदार सुहास कांदे यांचे नेतृत्वच मतदार संघाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाईल. असे सांगत महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचे आवाहन आपल्या भाषणातून व्यक्त केले.
रॅली व सभेस नांदगाव मतदार संघातील सर्व महत्वाचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्य,सोसायटी चेयरमन,सदस्य,व हजारो महिला, तरुणी, तरुण,पुरुष, जेष्ठ नागरिक हजारो च्या संख्येने उपस्थित होते.