मनमाड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भीमोत्सव २०२५’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रसिद्ध खंजिरीवादक शाहीर मीरा उमप, व्याख्याते डॉ. नागेश गवळी, भूषण पगारे, नाटक लोक-शास्त्र सावित्री, आणि महानाट्य ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. मनमाडकरांना या कार्यक्रमांचा एक प्रबोधनात्मक अनुभव मिळणार आहे. या भीमोत्सवाची सुरवात महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी होणार आहे, जो कार्यक्रमाचा एक विशेष प्रारंभ ठरेल.
मनमाड शहर आंबेडकरी चळवळीचा आणि विचारांचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. येथील भीम जयंती राज्यभर प्रसिद्ध असून, यासाठी विशेष कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातात. गेल्या नऊ वर्षांपासून शहरातील फुले शाहू आंबेडकर विचारांचे अनुयायी व्यक्ती एकत्र येत आहेत. “ना पावती ना वर्गणी” या तत्वावर त्यांनी आपले स्वतःचे पैसे जमा करून, एक आगळी-वेगळी भीमजयंती साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यामुळे या उत्सवाची विशेष ओळख बनली आहे, कारण या साजरीकरणात कोणतीही बाह्य मदत न घेता, शुद्धपणे समाजातील लोकांच्या योगदानावर आधारित असतो.
‘भीमोत्सव २०२५’ या उत्सवाची सुरवात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी ११ एप्रिलपासून १७ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ता. ११ रोजी सायं. ७ वा. एकात्मता चौकात ‘लोक-शास्त्र सावित्री’ हे नाटक सादर करून भीमोत्सवाचे उदघाटन केले जाईल. याच दिवशी सकाळी भारतीय संविधान या विषयावर व्याख्याते भूषण पगारे यांचे व्याख्यान होईल. ता. १२ रोजी सायं. ७ वा. एकात्मता चौकात ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर डॉ. नागेश गवळी यांचे व्याख्यान होईल. ता. १३ रोजी रात्री १२ वा. डॉ आंबेसकर पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. ता. १४ रोजी डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. ता. १६ रोजी सायं. ७ वा. एकात्मता चौकात प्रसिद्ध खंजीरीवादक मीराताई उमप यांचा आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम होईल. ता. १७ रोजी सायं. ७ वा. पोलीस परेड ग्राउंडवर डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे महानाट्य सादर होणार असल्याची माहिती भीमोत्सव आयोजन समितीचे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, संजय कटारे, निलेश वाघ, प्रा. डॉ. जालिंदर इंगळे आदींनी दिली.