मनमाड :
बुरुकुल वाडी प्रभाग क्रमांक दोन परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तब्बल पंधरा ते वीस कुत्र्यांचे टोळके एकत्र फिरत असून ते अक्षरशः पाळीव कोंबड्या, बकऱ्या यांना फाडून खात आहेत. इतकेच नव्हे तर लहान मुलांवर व नागरिकांवर हल्ला करून जखमी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा या प्रकाराची माहिती प्रशासनाला कळवूनही अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीत. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांमुळे स्त्रिया, शाळकरी मुले तसेच ज्येष्ठ नागरिक बाहेर पडताना घाबरत आहेत.
या गंभीर समस्येकडे नगरपालिकेने तातडीने लक्ष घालावे, मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना मनमाडचे उपशहर प्रमुख संजय दराडे यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.










