चौथीत शिकणाऱ्या ९ वर्षीय लोकेश सुनील सोनवणे या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद गुरूवारी रात्री शहरात उमटले.परिसरातील संतप्त नागरीकांनी रात्री उशिरा लोकेशला न्याय मिळालाच पाहिजे. गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे अशा उत्स्फूर्त घोषणा देत शहरातील नेहरू भवन येथून शहरातून मोर्चा व कँन्डल मार्च काढून इंदौर – पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.मोर्चात मोठ्या संख्येने महिलावर्ग सहभागी झाले होते तर नागरिक, तरुण वर्ग सहभागी झाले होते.
रास्तारोको झाल्याचे लक्षात येताच उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्यासह पोलीस पथकाने बळाचा वापर करत संतप्त जमाव पांगवला.कायदेशीररित्या पोलीस आपले काम करत आहे. लोकेशला न्याय मिळेल असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र काल रात्री झालेल्या ह्या घटनेमुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती व बाजार पेठेत शुकशुकाट पसरला होता.