नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून कांदा विक्रीस आलेला ट्रॅक्टर बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चोरी झाला. बाजार समितीच्या आवारातून बुधवारी रात्री माणीकपुंज येथील शेतकरी अर्जुन किसन कोल्हे या शेतकऱ्याने कांदा विक्री करण्यासाठी ट्रॅक्टर आणलेला होता. रात्री ९ ते १० च्या दरम्यान शेतकरी जेवण करण्यासाठी बाहेर आला असता त्यांचा ट्रॅक्टर ट्रॉली ला जोडलेला असताना अज्ञात इसमांनी ट्रॉली सोडून जॉन डेरी कंपनीचा ट्रॅक्टर चोरून नेला. याबाबत शेतकरी रात्री ११ वाजता पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यासाठी गेला असता त्यांची तक्रार घेण्यात आली नसल्याची माहीती शेतकरी संघटनेचे निलेश चव्हाण यांनी दिली. यावेळी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटसमोर नांदगाव येवला रोडवर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी आम आदमी पक्षाचे विशाल घडघुले यांनी शेतकऱ्यांच्या वतीने बोलतांना सांगितले की बाजार समीती वर्षाला ४५ लाख रूपये जाहीराती वर खर्च करते . आणी आवारात सी. सी. टी . व्ही . कॅमेरे लावू शकत नाही. यावेळी पोलीस प्रशासना कडून सहाय्यक पो. नि. ईश्वर पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आश्वासन देत ट्रॅक्टर लवकरात लवकर शोधू असे सांगण्याचा प्रयत्न केला परंतू शेतकरी रस्ता रोको करण्यावर ठाम होते.