भाटगाव तालुका चांदवड येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शाडूमाती पासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
शिक्षण मंडळ भगूर संचालित तालुक्यातील भाटगाव माध्यमिक विद्यालयात शाडूपासून पर्यावरणपूरक (इकोफ्रेंडली) गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरणपूरक गणराय साकारले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण, बीजारोपण, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या मूल्यांचे कृतीतून शिक्षण देणाऱ्या या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत गणेशमूर्तीमध्ये बेल, कडुलिंब, गुलमोहर, आवळा, सीताफळ, पेरू आदी वृक्षांच्या बी ठेवून बीजारोपण व संवर्धन करावे, गणेशमूर्तीचे विसर्जन घरातील परसबागेत कुंडीमध्ये करावे व जलप्रदूषण टाळावे, मातीपासून नवनिर्मिती साकारणे याविषयी मार्गदर्शन करून गणेशोत्सवासोबतच बीजारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यशाळेत १२० विद्यार्थी सहभागी झाले. कलाशिक्षक देव हिरे व सहाय्यक शिक्षक अनिल बहिरम यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक विजय सानप, पर्यवेक्षक भीमराव बोढारे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलाकृतींचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.















