जिल्ह्यात पशुधनासाठी चाराटंचाई निर्माण होऊ नये यासाठी चाऱ्याची वाहतूक, विक्रीवर जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले.
राज्य शासनाकडून नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ (ट्रिगर-१) जाहीर केला आहे. नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण होऊ शकते.
यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रसाद यांनी याबाबत निर्बंध जारी केले आहेत. चाराटंचाईमुळे पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये आणि जिल्ह्यातील पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध व्हावा हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १० डिसेंबरपर्यत हे निर्बंध लागू राहणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हिरवा चारा, कडबा, ऊस बांड्यांची कुट्टी, पेंढा, टीएमआर (एकूण मिश्रित पशुखाद्य) तसेच इतर प्रकारच्या पशुखाद्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक व विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून वगळण्यात आले आहे.












